यश-अपयश ; संकल्पना आणि वास्तविकता


    यश’ एक अशी गोष्ट जी आपल्याला समाजाच्या दृष्टीने पाहता उत्तम आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम व्यक्ती या दृष्टीने पाहते. गेली अनेक वर्षे याच सामाजिक दृष्टीने कित्येक आयुष्य बनविली आणि बिघडवली ही. खरचं यश किंवा अपयश हे आर्थिक सक्षमतेवर अवलंबून असते का? तर याचे उत्तर आहे ‘नाही’.

            एखादी व्यक्ती यशस्वी आहे किंवा अयशस्वी हे समाज ठरवत नसतो. यश-अपयश हे ती व्यक्ती स्वतः ठरवते. आपल्याकडे जे आहे त्यात तुम्ही आनंदी असाल तर तुम्ही स्वतः यशस्वी आहात याची जाणीव होईल. पण जर तुम्ही दुसऱ्याच्या जगण्याच्या पद्धतीला यश मानत असाल तर तुम्ही अयशस्वी आहात याची जाणीव स्वतःला करून द्याल. आता यश-अपयश ; संकल्पना आणि वास्तविकता समजून घेवूया.

दृष्टिकोन :

            यश-अपयश हा पूर्णपणे दृष्टीकोनाचा भाग आहे. ‘खूप पैसे मिळवले म्हणजे तुम्ही यशस्वी झालात का?’ हा प्रश्न एकदा स्वतःला विचारून पहा. उदा. ‘इयत्ता दहावी किंवा बारावी मध्ये खूप उच्च गुणांनी उत्तीर्ण झालात म्हणजे तुम्ही यशस्वी झालात का?’. यश प्रत्येकासाठी समान असते असे नाही. खूप पैसे मिळविणारी व्यक्ती जर त्याच्या वैयक्तिक आयुष्यात सुखी किंवा समाधानी नसेल, रात्री शांत झोपत येत नसेल तर याला आपण यश म्हणावे का? जर एखादी व्यक्ती ५ हजार रुपये प्रती महिना कमावतो पण तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यात सुखी आणि आनंदी आहे, रात्री शांत झोपतो, दोन वेळचे अन्न खातो याला आपण अपयश म्हणावे का? म्हणून आपण प्रथम हे समजून घेतलं पाहिजे कि ‘यश-अपयश हा पूर्णपणे दृष्टीकोनाचा भाग आहे’.

संकल्पना :

            पिढी दर पिढी यश-अपयश हि संकल्पना बदलत गेली पण आज हि या संकल्पने मध्ये बदल झाला नाही. तो बदल म्हणजे राहणीमान आणि आर्थिक उत्पन्न. या मध्ये फक्त एका व्यक्तीची चूक आहे असे नाही. सामाजिक जीवनामध्ये झपाट्याने झालेल्या बदलांमुळे हि संकल्पना जन्माला आली कि राहणीमान आणि आर्थिक उत्पन्न तुमचे यश-अपयश ठरविते.

गावातील व्यक्ती शहराकडे आली, चांगली नोकरी मिळवून उत्पन्न मिळवू लागली. शहरातील राहणीमान आत्मसात करून आधुनिक जगतातील महागडे कपडे घालू लागली. त्या नंतर हीच व्यक्ती जेव्हा गावात परत जाते त्या वेळी गावातील सामान्य व्यक्ती त्याला पाहता त्याच्या राहणीमान आणि आर्थिक उत्पन्न या कडे पाहून ठरविते कि तो यशस्वी झाला. ‘ज्या वेळी आपण समोरच्याकडे काय आहे आणि आपल्याकडे काय नाही हे पाहतो त्या वेळी आपण समोरच्याला यशस्वी समजत नाही तर स्वतःला अयशस्वी असल्याची जाणीव करून देतो त्यामुळे समोरचा यशस्वी वाटू लागतो.

वास्तविकता :

            यश-अपयश हि संकल्पना वास्तविक जीवनात पूर्ण पणे वेगळी आहे. प्रत्येक व्यक्ती यश आणि अपयश या दोन्ही टप्प्यातून प्रवास करत असते. आपण पूर्ण वेळ यशस्वी नसतो किंवा अयशस्वी हि नसतो. ज्याप्रमाणे सुखं आणि दुखं हे जीवनाच्या प्रत्येक टप्प्यात येत जात असते तसेच आपण यश आणि अपयश या दोन्ही टप्प्यातून जात असतो. उदा. खूप मेहनत करून उत्तम गुण मिळविले तर आपण यशस्वी असल्याची जाणीव आपल्याला होते पण पुढील शिक्षणासाठी आपल्याला उत्तम गुण असूनही आपल्याला महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळत नाही त्या वेळी आपण कुठे तरी कमी पडलो याची जाणीव होते आणि त्याला आपण अपयश समजतो.

            सध्या आपण २१ व्या शतकात जगत आहोत पण आपल्याला यश-अपयश हि संकल्पना आजही समजली नाही. आज प्रत्येक व्यक्ती शिक्षण घेते, उच्च शिक्षणासाठी परदेशी जावून आली तरी हि यश-अपयश या बद्दल जाणून घेवू शकली नाही.

            आपण मुलांना यश-अपयश या दृष्टीने पाहतो. आपल्या पाल्याने किती गुण मिळवले या कडे न पाहता शेजारील मुलाने किती गुण मिळविले या सोबत तुलना करतो.  आपण या पिढीला मानसिक त्रासात वयाच्या खूप कमी टप्प्यातच टाकतो. सतत तुलनात्मक दृष्टीने त्या मुलांच्या मनावर हे बिंबवले जाते कि ‘तू अपयशी आहेस.’ या मुळे कित्येक मुलं आजही मागे आहेत, जी आयुष्यात खूप पुढे जावू शकतात. जी मुलं अभ्यासात उत्तम नाहीत ती अन्य गोष्टींमध्ये उत्तम असतात. आपल्या मुलांच्या चुका शोधण्यापेक्षा त्यांच्यातील गुण पहा, त्या गुणांना योग्य संधी मिळवून द्या. वास्तविक जीवनाकडे पाहून आपल्या मुलांना सर्व प्रथम यश आणि अपयश काय असते हे समजावून सांगा आणि त्यासाठी स्वतः योग्य रित्या हि संकल्पना समजून घ्या.

            यश आणि अपयश या बद्दल आपण आपल्या मुलांना चुकीची माहिती देतो, त्यामुळे अपयश प्राप्त झाल्यावर मुले पालकांच्या भीतीने आत्महत्या करतात. गेली कित्येक वर्षे या घटना घडतं आहेत आणि आजही या घटनांचे प्रमाण कमी झालेले नाही. या घटनांना आपणच जबाबदार आहोत. पाल्य करू शकला नाही म्हणून आत्महत्या केली असे नसून आपण त्यांच्या मनात अपयश हि संकल्पना वेगळ्या स्वरुपात पोहचवली आहे.

            अनेक यशस्वी व्यक्ती आणि उद्योजक हे सर्व अपयशाला सामोरे जावून आज यशस्वी झाले आहेत. तरी हि त्यांच्या जीवनात चढ आणि उतार हे कायम असतात. मुलांना कोणासारखा हो हे सांगण्यापेक्षा त्याला एक उत्तम व्यक्तिमत्व होण्यास सांगा. ते व्यक्तिमत्व त्या मुलाचे स्वतःचे असले पाहिजे कोणा दुसऱ्याचे नाही. हि वास्तविकता जर आपण समजून आपल्या जीवनात लागू केली तरच यश आणि अपयश हि संकल्पना  बदलू शकले आणि प्रत्येक व्यक्ती यश आणि अपयश या कडे श्राप म्हणून न पाहता दोन्ही कडे वरदान म्हणूनच पाहतील. कारण अपयश खूप काही शिकवून जाते आणि यश डोक्यामध्ये गर्व भावनेची चुकीची हवा हि भरते.

त्या मुळे यश आणि अपयश या पैकी कोणी एक उत्तम नाही आणि कोणी एक चुकीचा हि नाही. फरक आहे तो आपल्या दृष्टीकोणाचा.

_ सिद्धार्थ मयेकर.

प्रसिद्धी : तरुण भारत गोवायुवा ट्रॅक : खुला मंच, ७ ऑक्टोबर २०२२ 

 I write... ✍🏻 what I feel... 💖💖

Copyright© 2020 - 2022
Sidharth

I am experienced in Digital Marketing, Web Developing, Banner Designs, Computer Repairing, Teaching also Motivational Speech.

Post a Comment

Previous Post Next Post